Friday 13 December 2013

नैतिक शिक्षणामुळेच नवी दिशा मिळेल : भगवानभाई



नैतिक शिक्षणामुळेच नवी दिशा मिळेल : भगवानभाई

मडगाव : आजच्या स्पर्धात्मक युगात भौतिक शिक्षणाबरोबरच नैतिक शिक्षणाची गरज असल्याचे मत माऊंट आबू येथून आलेले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश् विद्यालयाचे राजयोगी ब्रह्मकुमार भगवानभाई यांनी केले. ते अखिल भारतीय शैक्षणिक अभियानच्या कार्यक्रमात 'नैतिक शिक्षणाचे महत्त्व' या विषयावर दामोदर कॉलेज आणि दामोदर हायस्कूल येथे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आजचा युवक हा उद्याचा भावी समाज आहे. उद्याच्या समाजातील स्त्री-पुरुषांना सशक्त बनविण्यासाठी युवा पिढीला नैतिक शिक्षण देऊन सशक्त बनविणे गरजेचे आहे.
फक्त अक्षर ज्ञान हेच शिक्षण असे नसून जीवनरूपी वृक्षाला सद्गुणांची फळे जोपर्यंत लागत नाहीत, तोपर्यंत शिक्षण अपूर्ण आहे, असे म्हणायला हरकत नाही. या वेळी ब्रह्मकुमारी बी.के. रेखा बहन यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने भगवानभाई यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शिक्षकवर्गही उपस्थित होता. शेवटी मुख्याध्यापक फालेरो यांनी आभार प्रदर्शन केले.
(प्रतिनिधी) दामोदर हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसमोर बोलताना ब्रह्मकुमार भगवानभाई.